Monday, April 1, 2019

समजलं का? यापेक्षा महत्त्वाचं install झालं का ?



रोहन समजलं का ?” रोहनला पुस्तकातील भरती- ओहोटी याबद्दल माहिती दिल्यावर ताईंनी विचारलं...
हो समजलं नारोहन म्हणाला.काय समजल?” ताईंचा प्रश्न.
चंद्राच्या कलांमुळे भरती ओहटी येतेरोहनचे उत्तर.पण म्हणजे काय होतं . . . रोहन
आता रोहनची विकेट उडाली व ताईंनी परत तीच माहिती द्यायला सुरूवात केली. रोहननी तेच अनोळखी, अवघड शब्द गिळायला सुरूवात केली. ही माहिती ताई परत अशीच सांगणार व रोहन परत परत आठवत राहणार..
हे असे संवाद आपल्याला देखिल नवीन नाहीत.लक्षात आलं का?” “समजलं का?” हे प्रश्न सतत विचारले जातात व त्यांची सुरूवातीला हो उत्तर मिळाल्यावरही काही समजले आहे की नाही हे कळत नाही. याच कारण समजलं का? लक्षात आलं का? याचा खूप सोपा अर्थ आपण सगळेच घेत असतो.
बहुतेक वेळा समजलं का याचा अर्थ ऐकलं का? एवढाच असतो पण अपेक्षा मात्र त्यातून स्वतः काही विचार केला की नाही हे समजून घ्यायची असते. रोहनने भरती ओहोटीची सर्व माहिती ऐकली, वाचलीही असते. यातील प्रत्येक वाक्य व शब्द या सगळ्याचा अर्थ माहित असतो, म्हणजे प्रत्येक वाक्य स्वतंत्रपणे त्याला कळलेही असते. पण त्या सगळ्याचा एकत्रित अर्थ मात्र निश्चितच कळलेला नसतो.
बोली भाषेत ज्याला आपण समजलं असं म्हणतो ते म्हणजे आकलन ! अभ्यास करताना एखादी माहिती दिल्यावर आपली अपेक्षा पूर्ण आकलनाची म्हणजे समजण्याची असते. हे म्हणजे एकदा software copy किंवा download झाल्यावर ते वापरता यावं असं वाटण्यासारखं आहे. संगणकात जशी install ही कमांड असते. तशी माणसाला सुद्धा ग्रहण केलेली माहिती प्रक्रिया करून योग्य ठिकाणी ठेवावी लागते. अशी मेंदूत प्रक्रिया झाली नाही व ती माहिती नीट ठेवली नाही तर ती वापरता येत नाही. परत मांडता येत नाही.
लहान मुलं कसं शिकतात...? कैरी सांगितल्यावर ४ ५ वर्षाच्या मुलाला कळलं नाही तर आपण त्याचा अर्थ अथवा वर्णन सांगतो. मग त्याला फळ दाखवतो. शक्य असेल तर ते चाखवतो अथवा त्याची आठवण करून देतो. हे करताना त्याला पहिल्या प्रयत्नात समजलं पाहिजे ही अपेक्षा करत नाही. चुका दुरूस्त करतो. मग ते मुलं शिकतं. पुढच्या वेळेस आपण त्याला कैरी सांगितलं की ते म्हणू शकतंनको, खूप आंबट असते.” “हो, आंबट असते पण मस्त असते.या मुलांची आकलनाची प्रक्रिया बरीचशी पूर्ण झाली. आपण त्याला उच्चार-अर्थ-अनुभव या पायऱ्यांवरून जाऊ दिलं. हे करताना त्याला स्पर्श-रंग-रस-गंध या निरीक्षणांसह, त्याच्या प्रश्नांचही आपण स्वागत केलं. त्यातून त्याला कैरी समजली. आपण आपल्या शालेय मुलांना अभ्यास करायला सांगताना मात्र install न करता app फक्त download करून ते वापरायला सांगतो. समजून घ्यायचं अथवा install करायचं म्हणजे नक्की काय करायचं?
अर्थात चांगल श्रवण अथवा वाचन ही याची पहिली पायरी आहे. ही पायरी देखिल सदोष नाही ना याची खात्री करायला हवी. आपण असं गृहित धरू की ही पायरी बहुतेक वेळा बरोबर असते. रोहननेही सर्व आशय ऐकला होता, व त्याच्या म्हणण्यानुसार तो त्याला समजलाही होता. परत वाचतानाही त्याला काही अडचण आली नाही. पण आकलन मात्र काही झाले नाही.
याचं मुख्य कारण बहुतेक वेळा समजणं म्हणजे परत आठवणं असा अर्थ गृहित धरला जातो. शब्द तसेच्या तसे आठवता आले तरीही चांगलं आकलन झालं आहे असं म्हणता येत नाही. त्यासाठी ग्रहण केलेले (वाचलेल्या अथवा ऐकलेल्या) माहितीवर मनात प्रक्रिया व्हावी लागते. त्यातील प्रत्येक वाक्य जोडत त्याचं एक चित्र तयार व्हावं लागतं. हे सगळं न करता झालेले वाचन अथवा श्रवण हे निरस अथवा तांत्रिक असतं. पण ही सगळी जोडणी व्हायची असेल तर त्याआधी लागतं ते कुतूहल. त्यासाठी ताईंनी रोहनचा एक खेळ घेतला. त्यांनी रोहनला डोळे मिटून शांतपणे बसायला सांगितले. खेळ साधा सोपा होता ... ताई भरती म्हणजे... असा प्रश्न विचारणार व रोहन त्याच्या मनात येणारे, संबधित अथवा माहित असलेले शब्द / उत्तर सांगत राहणार. ताईंनी सुरूवात केली.
भरती म्हणजे ... समुद्र
भरती म्हणजे .... उसळणाऱ्या लाटा
भरती म्हणजे .... अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावरची संध्याकाळ
भरती म्हणजे .... पुढे येणारे पाणी
भरती म्हणजे .... कुठेतरी ओहोटी
भरती म्हणजे .... खाडीत वाढलेले पाणी
भरती म्हणजे .... गुरुत्वाकर्षण
भरती म्हणजे .... चंद्राच्या कला
रोहनला उत्तर द्यायला हळूह्ळू वेळ लागायला लागला व शेवटी त्याच्याकडचे पर्याय संपले. व त्याने डोळे उघडले. ताईंच्या या खेळामुळे काय झाले?
जो रोहन कंटाळा आल्यासारखा वाचत होता तो आता मनाने समुद्रावर गेला. त्याच्या डॊळ्यासमोर पुस्तकातील हा मजकूर न येता प्रत्यक्ष भरती पाहिल्याच्या आठवणी येत होत्या. त्यातनं त्याचा विचार सुरू झाला. त्याचं मन आता याबद्दलची माहिती घेण्यासाठीही उत्सुक झालं. कुठल्याच पर्यायाला ताईंनी ‘चू म्हटल नसल्याने रोहन जास्तीत जास्त प्रयत्नशील झाला. आता रोहनला ताईंनी परत वाचायला सांगितले. मगाचपेक्षा थोडं जास्त कळल. आता खरं सांगायचं तर माहितीची प्रक्रिया करायची रोहनची सुरूवात झाली. त्याने वाचलं पण त्याला सगळं कळलं आहे असं वाटत नव्हतं. अर्थात हे ताईंना माहित होतं, त्यामुळे ताईंनी काय कळलं नाही ते विचारायला सांगितले. पण रोहनचा एकच प्रश्न होता.नेमकं काय कळलं नाही हे कळत नाही
हे फार छान होतं... सुरुवात सगळं समजलं म्हणून झाली. मग आपल्याला काहीच समजलं नाही हे समजलं...
आता थोड समजलय पण काय समजलय ते माहित नाही.
ताई हसल्या व त्यांना नक्की काय होतंय हे कळलं. ताईंनी परत एक खेळ घेतला. ताई रोहनला म्हणाल्या, ‘’भरती व ओहोटी यावर मनात येतील ते (उत्तर माहित असलेले.... नसलेले) प्रश्न विचारायला सांगितले व ताईंनी प्रश्न लिहायला सुरुवात केली. काही प्रश्न माहितीपर, तर काही . . .  असे झाले तर? (creative), काही मुलभूत संकल्पनेला हात घालणारे हे प्रश्न होते. विचारून झाल्यावर ताईंनी रोहनला यावर Wikipedia वरचं article वाचायला दिले. त्यातनं रोहनला अजून काही links बघाव्याशा वाटल्या त्या त्याने बघितल्या. एक youtube वरचं animation बघितलं. आता रोहनचे प्रश्न अजून नेमके झाले. पण ताईंनी आता रोहनला थांबवलं. त्याला विचारलंआता समजलं का?” रोहन हसला व म्हणालापुस्तकात लिहिलेलं समजलं पण अजून काही गोष्टी समजून घ्याव्याशा वाटत आहेतरोहनच्या मनात आता भरती ओहोटी हे app / software install झालं होतं. ते वापरताना त्याला अनेक प्रश्न पडणार होते व उत्तरही मिळणार होती.
यासाठी ताईंनी रोहनला काय काय करायला लावलं. तर सुरूवातीला त्याच्या मनातलं कुतुहल(making curious) जागं केलं. ग्रहण केलेल्या माहितीचा अर्थ लावत कल्पनेतून (imagination) ती बघायला लावली. त्यावर रोहनच्या मनात अनेक प्रश्न (questioning) तयार केले. ही सर्व माहिती योग्य त्या संदर्भासह जुन्या माहितीला जोडत (connect & co-relate) यातून त्याची आकलन ही प्रक्रिया सुरु झाली.
विद्यार्थ्याच असं आकलन (Understanding) होण्यासाठी केवळ एकसूरी वाचन व परीक्षा पुऱ्या पडत नाहीत. त्या विद्यार्थ्याबरोबर ही सगळी प्रक्रिया घडवावी लागते. कधी त्याच्या बरोबर तर कधी अप्रत्यक्षपणे... एखाद्या विषयातील असे काही अनुभव विद्यार्थ्यांना घेता आले तर एकूणच तो विषय interesting वाटायला लागतो. मग हळूहळू त्यातला विचार करायची समजून घ्यायची सवय लागायला सुरूवात होते.परीक्षेसाठी नाही तर आमच्या राजुला विज्ञान खेळणी करण्यासाठी त्याबद्दलची पुस्तक वाचायला आवडतातअशी पालकांची वाक्य मग ऐकायला मिळतात. ही आवड जोपासली गेली तर मुले अभ्यासात स्वावलंबी व्हायला सुरूवात होते.
थोडा मोठा प्रवास आहे पण त्याची ओळख अथवा सुरूवातीचा धक्का देण्यासाठी आम्हीस्व-अभ्यास कौशल्यकार्यशाळा घेणार आहोत.
आकलनाची ही प्रक्रिया, मजा एकदा मुलांबरोबर आम्हीही घेऊन बघणार आहोत. आपणही आपल्या मुलाला असा अनुभव देऊ शकाल. कदाचित मुलाला स्वतःचा अभ्यास स्वतः आनंदाने करताना बघताना तुम्ही पालक म्हणून वेगळा अनुभव घेऊ शकाल.
परीक्षेनंतर स्वत:साठी केलेला अभ्यास व त्यातली मजा घेण्याची कार्यशाळा होणार आहे मन्थन तर्फे. संपर्क व अन्य माहितीसाठी web link press करा.


- राहुल कोकीळ
९८८१४०२१९०
८२७५७४०३२४ 
manthanei@gmail.com



Friday, March 15, 2019

मुलं केव्हा शिकतात...


            शिकणं खरंतर किती सहजच घडतं. अगदी नुकतंच जन्माला आलेलं मूल भूक लागली की रडतं. प्रथम रडल्यावर आपलं काम होणार हे त्याला माहित नसतं. रडणं ही आपोआप घडणारी अशी प्रक्रिया. रडल्यावर जेव्हा प्रथम त्याला दूध मिळतं आणि त्याचं पोट भरतं. त्याला कळतं की भूक लागली की रडायचं. म्हणजेच सहज घडणाऱ्या क्रियेतून गरज पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो. तेव्हा मूल प्रथम शिकतं ते रडण्याचं महत्त्व. अर्थात हे नकळतच होत जातं.
           प्रत्येक टप्प्यावर थोड्या फार फरकानं हेच दिसतं. मुलाला दोन चॉकलेट्स दिली आणि एक काढून घेतलं तर ते चिडतं, रडतं. आपल्याकडून काहीतरी कमी झालेलं आहे हे कळतं. आपल्याकडे आहेत त्या खेळण्यांमध्ये खूप खेळणी मिळाली की मुलाला आनंद होतो. थोडक्यात, काहीतरी अधिक झालं हे सहजपणे त्याला समजलेलं असतं.
             आता याच पार्श्वभूमीवर आपण म्हणू शकतो की, शिकण्याची प्रक्रिया सतत चालू असते. फक्त शाळेत जाण्यापूर्वी ती सहजपणे आणि गरज पूर्ण होण्यापर्यंत मर्यादित असते. त्यानंतर, म्हणजे शाळेनंतर त्यातील संदर्भ थोडा बदलत जातो. शाळेत गेल्यावर 2x2 = 4, 2x3 =6 हे शिकण्याची सहज प्रक्रिया आणि गरज याचं गणित जमत नाही. 2 ते 30 पर्यंतचे पाढे म्हणून त्या क्षणी कोणतीच गरज पूर्ण होणार नसते. ते त्यांचं शिकणं ही पालकांची गरज असते. त्या मुलांच्या भविष्यासाठी केलेली तरतूद असते आणि इथेच थोडासा गोंधळ सुरू होतो.
              वर्तमान आणि थोडं भविष्यकाळात पाहणं हे पालकांसाठी निश्चितच योग्य. पण मुलांना केवळ वर्तमानकाळातच जगणं जमतं, योग्य वाटतं. त्यामुळे शाळेतलं शिक्षण सुरू होतं तेव्हा मुलं थोडी कंटाळा करतात. शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते प्रत्येक वेळेस गरज निर्माण झाली की शिकणं असं होऊ शकत नाही किंवा होऊ नये.
              मग आपली गरज ही मुलांसाठी आवड बनवावी लागते. म्हणजेच त्यांना प्रोत्साहन देऊन, त्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये आनंद निर्माण करून काम करावे लागते. यासाठी आपण आधार घेतो स्पर्धेचा, परीक्षांचा, कौतुकाचा. मुलांमध्ये स्पर्धा घेऊन त्यात जिंकलेल्या स्पर्धकाला बक्षिस दिलं जातं. परीक्षेत चांगले गुण मिळाले की त्याचं कौतुक केलं जातं. थोडक्यात, वर्तमानात त्यांना शाळेतील शिकणं आवडावं यासाठी केले जाणारे हे प्रयत्न. त्या शिकण्याची पायरी चढायला सुरूवात व्हावी ही भूमिका.
              10 ते 15 पाढे म्हणण्याची स्पर्धा घेतल्यानंतर त्यांना पाढे शिकणे ही गरज आहे हे कळत नाही. पण न चुकता पाढे म्हटल्यानंतर मला शाब्बासकी मिळेल हे त्यांना कळतं. ती मिळविणे ही त्यांची गरज असते. मग कौतुक, स्पर्धेतील क्रमांक, परीक्षेतील गुण, प्रोत्साहन या गरजेतून शिकणं सुरू व्हायला लागतं. पण ही स्पर्धेतून निर्माण केलेली गरज कुठपर्यंत शिकण्यासाठी उपयोगी पडणार हा विचार करण्यासारखा मुद्दा. कारण ज्यांना त्यात यश मिळत नाही त्या मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत जातो.
                 मग याचं स्वरूप थोडं बदलता येईल का? स्पर्धा किंवा कौतुक याच्यासाठी न शिकता एखाद्या विषयातील केलेला अभ्यास, त्यावर केलेला विचार, त्यातून पडणारे प्रश्न, ते सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न यामधून वर्तमानातील त्यांची गरज आणि आनंद यांची सांगड घालता येईल का?  
अगदी सात-आठ वर्षाच्या मुलांसाठी हा विचार थोडा अवघड वाटेलही. पण या मुलांना टिव्ही बघायला खूप आवडतं. नाहीतर मग मोबाईल पाहणं, अगदीच नाही तर एखाद्या शिकवणीला जाणं हे त्यांचं रूटीन बनलेलं असतं. यामुळे या मुलांना कंटाळा येईपर्यंतचा मोकळा वेळ मिळतच नाही. त्यांना काहीतरी स्वतःच्या हातांनी काम करावंसं वाटावं, काहीतरी शिकावं असं वाटावं यासाठी त्यांना मोकळा वेळ मिळायला हवा. त्यातून त्यांचे स्वतःचे विचार सुरू होतील, आपल्याला काय करायचं आहे हे अगदी वर्तमानापुरतं का होईना ते ठरवू शकतील. अशावेळी त्यांचा शोध सुरू होईल शिकण्याचा, काही नवीन निर्माण करण्याचा. यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांसाठी एखाद्या विषयातील सखोल माहिती मिळवली की ते कसं आत्मविश्वास वाढवणारं ठरतं याचा अनुभव येईल. हळूहळू आत्मविश्वास वाढवणं, स्वतःची प्रगती करणं ही त्यांच्यादृष्टिनं एक गरज ठरायला लागेल. मग, त्यांचं शिकणं आपोआप सुरू होईल.
               यासाठी पालक म्हणून आपल्याला त्यांना थोडी मदत करायची आहे ती शिकण्याची गरज निर्माण करण्याची, गरज पूर्ण करताना आवश्यक असलेल्या त्यांच्या काही आवश्यक मागण्या नकळत पूर्ण करण्याची. त्यांची आवडही ओळखावी लागेल. या सगळ्यातून त्यांना स्वतः प्रयत्न केल्याचा आनंद इथपर्यंत न्यावे लागेल.....
स्वराली

समजलं का? यापेक्षा महत्त्वाचं install झालं का ?

“ रोहन समजलं का ?” रोहनला पुस्तकातील भरती- ओहोटी याबद्दल माहिती दिल्यावर ताईंनी विचारलं... “ हो समजलं ना ” रोहन म्हणाला. “ काय समजल ...