Friday, March 15, 2019

मुलं केव्हा शिकतात...


            शिकणं खरंतर किती सहजच घडतं. अगदी नुकतंच जन्माला आलेलं मूल भूक लागली की रडतं. प्रथम रडल्यावर आपलं काम होणार हे त्याला माहित नसतं. रडणं ही आपोआप घडणारी अशी प्रक्रिया. रडल्यावर जेव्हा प्रथम त्याला दूध मिळतं आणि त्याचं पोट भरतं. त्याला कळतं की भूक लागली की रडायचं. म्हणजेच सहज घडणाऱ्या क्रियेतून गरज पूर्ण झाल्याचा आनंद मिळतो. तेव्हा मूल प्रथम शिकतं ते रडण्याचं महत्त्व. अर्थात हे नकळतच होत जातं.
           प्रत्येक टप्प्यावर थोड्या फार फरकानं हेच दिसतं. मुलाला दोन चॉकलेट्स दिली आणि एक काढून घेतलं तर ते चिडतं, रडतं. आपल्याकडून काहीतरी कमी झालेलं आहे हे कळतं. आपल्याकडे आहेत त्या खेळण्यांमध्ये खूप खेळणी मिळाली की मुलाला आनंद होतो. थोडक्यात, काहीतरी अधिक झालं हे सहजपणे त्याला समजलेलं असतं.
             आता याच पार्श्वभूमीवर आपण म्हणू शकतो की, शिकण्याची प्रक्रिया सतत चालू असते. फक्त शाळेत जाण्यापूर्वी ती सहजपणे आणि गरज पूर्ण होण्यापर्यंत मर्यादित असते. त्यानंतर, म्हणजे शाळेनंतर त्यातील संदर्भ थोडा बदलत जातो. शाळेत गेल्यावर 2x2 = 4, 2x3 =6 हे शिकण्याची सहज प्रक्रिया आणि गरज याचं गणित जमत नाही. 2 ते 30 पर्यंतचे पाढे म्हणून त्या क्षणी कोणतीच गरज पूर्ण होणार नसते. ते त्यांचं शिकणं ही पालकांची गरज असते. त्या मुलांच्या भविष्यासाठी केलेली तरतूद असते आणि इथेच थोडासा गोंधळ सुरू होतो.
              वर्तमान आणि थोडं भविष्यकाळात पाहणं हे पालकांसाठी निश्चितच योग्य. पण मुलांना केवळ वर्तमानकाळातच जगणं जमतं, योग्य वाटतं. त्यामुळे शाळेतलं शिक्षण सुरू होतं तेव्हा मुलं थोडी कंटाळा करतात. शाळेमध्ये जे शिकवलं जातं ते प्रत्येक वेळेस गरज निर्माण झाली की शिकणं असं होऊ शकत नाही किंवा होऊ नये.
              मग आपली गरज ही मुलांसाठी आवड बनवावी लागते. म्हणजेच त्यांना प्रोत्साहन देऊन, त्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये आनंद निर्माण करून काम करावे लागते. यासाठी आपण आधार घेतो स्पर्धेचा, परीक्षांचा, कौतुकाचा. मुलांमध्ये स्पर्धा घेऊन त्यात जिंकलेल्या स्पर्धकाला बक्षिस दिलं जातं. परीक्षेत चांगले गुण मिळाले की त्याचं कौतुक केलं जातं. थोडक्यात, वर्तमानात त्यांना शाळेतील शिकणं आवडावं यासाठी केले जाणारे हे प्रयत्न. त्या शिकण्याची पायरी चढायला सुरूवात व्हावी ही भूमिका.
              10 ते 15 पाढे म्हणण्याची स्पर्धा घेतल्यानंतर त्यांना पाढे शिकणे ही गरज आहे हे कळत नाही. पण न चुकता पाढे म्हटल्यानंतर मला शाब्बासकी मिळेल हे त्यांना कळतं. ती मिळविणे ही त्यांची गरज असते. मग कौतुक, स्पर्धेतील क्रमांक, परीक्षेतील गुण, प्रोत्साहन या गरजेतून शिकणं सुरू व्हायला लागतं. पण ही स्पर्धेतून निर्माण केलेली गरज कुठपर्यंत शिकण्यासाठी उपयोगी पडणार हा विचार करण्यासारखा मुद्दा. कारण ज्यांना त्यात यश मिळत नाही त्या मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होत जातो.
                 मग याचं स्वरूप थोडं बदलता येईल का? स्पर्धा किंवा कौतुक याच्यासाठी न शिकता एखाद्या विषयातील केलेला अभ्यास, त्यावर केलेला विचार, त्यातून पडणारे प्रश्न, ते सोडविण्यासाठी केलेला प्रयत्न यामधून वर्तमानातील त्यांची गरज आणि आनंद यांची सांगड घालता येईल का?  
अगदी सात-आठ वर्षाच्या मुलांसाठी हा विचार थोडा अवघड वाटेलही. पण या मुलांना टिव्ही बघायला खूप आवडतं. नाहीतर मग मोबाईल पाहणं, अगदीच नाही तर एखाद्या शिकवणीला जाणं हे त्यांचं रूटीन बनलेलं असतं. यामुळे या मुलांना कंटाळा येईपर्यंतचा मोकळा वेळ मिळतच नाही. त्यांना काहीतरी स्वतःच्या हातांनी काम करावंसं वाटावं, काहीतरी शिकावं असं वाटावं यासाठी त्यांना मोकळा वेळ मिळायला हवा. त्यातून त्यांचे स्वतःचे विचार सुरू होतील, आपल्याला काय करायचं आहे हे अगदी वर्तमानापुरतं का होईना ते ठरवू शकतील. अशावेळी त्यांचा शोध सुरू होईल शिकण्याचा, काही नवीन निर्माण करण्याचा. यापेक्षा थोड्या मोठ्या मुलांसाठी एखाद्या विषयातील सखोल माहिती मिळवली की ते कसं आत्मविश्वास वाढवणारं ठरतं याचा अनुभव येईल. हळूहळू आत्मविश्वास वाढवणं, स्वतःची प्रगती करणं ही त्यांच्यादृष्टिनं एक गरज ठरायला लागेल. मग, त्यांचं शिकणं आपोआप सुरू होईल.
               यासाठी पालक म्हणून आपल्याला त्यांना थोडी मदत करायची आहे ती शिकण्याची गरज निर्माण करण्याची, गरज पूर्ण करताना आवश्यक असलेल्या त्यांच्या काही आवश्यक मागण्या नकळत पूर्ण करण्याची. त्यांची आवडही ओळखावी लागेल. या सगळ्यातून त्यांना स्वतः प्रयत्न केल्याचा आनंद इथपर्यंत न्यावे लागेल.....
स्वराली

1 comment:

  1. दोन्हीही लेख छान आहेत.

    ReplyDelete

समजलं का? यापेक्षा महत्त्वाचं install झालं का ?

“ रोहन समजलं का ?” रोहनला पुस्तकातील भरती- ओहोटी याबद्दल माहिती दिल्यावर ताईंनी विचारलं... “ हो समजलं ना ” रोहन म्हणाला. “ काय समजल ...